साखरखेर्डा परिसर

१) मंदिर परिसर
२) पलसिद्ध मंदिर
३) श्रीमहालक्ष्मी मंदिर
४) श्रीगुंज-माथा मंदिर (श्री गुप्तेश्वरी देवी संस्थान)
५) श्रीराम मंदिर

साखरखेर्डा हि मुळातच पुण्यभूमी आहे. अत्यंत प्राचीन काळी धौम्य ऋषींचा आश्रम याच भागात होता.आजही येथून जवळच दोन मैलांच्या अंतरावर रताळी या गावी धौम्य ऋषींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली दिसून येते. त्यांच्या तपस्चार्येने तपःपूत झालेली व यज्ञयागादी पुण्य कर्मांनी पुनीत झालेली साखरखेर्डा हि भूमी आहे.

देवत्व जसे दिसून येते, तसेच दैत्यत्वसुद्धा यास ठिकाणी होते. खेटकासूर नावाचा बलाढ्य राक्षस या निबिड अरण्यात वास्तव्यास होता व त्याचे हे राज्य होते.श्रीभगवान महादेवांच्या वराने उन्मत्त झालेल्या क्रूरकर्मा खेटकासूर क्रौर्याची परिसीमा गाठत होता आणि यज्ञयागादी कर्मांचा विध्वंस करत होता. धौम्य ऋषींचा प्रार्थनेने प्रसन्न होऊन जगदंबा जाग्देश्वरीने अवतीर्ण होऊन, आपल्या प्रचंड सामर्थ्यानिशी, खेटकासुराशी १८ दिवस तुंबळ युद्ध करून त्याचा वध केला आणि असंख्य अश्राप जीवांची राक्षसच्या दासात्वातून व क्रूर कर्मापासून मुक्तता केली. जगदंबा जगदेश्वरी – भक्तप्रिया महालक्ष्मीच्या दृष्टीक्षेपाने हा साखरखेर्ड्याचा परिसर पवित्र झालेला आहे. आजही हे महालक्ष्मीचे मंदिर डौलाने गावाच्या पूर्वेस उभे आहे.

याच परिसरातून मर्यादा पुरषोत्तम श्रीरामचंद्र प्रभूंच्या वनवास गमनाचा मार्ग गेलेला आहे. साधकांचे विश्रामधाम असलेल्या श्रीरामचंद्रांचे पदाज्ब या वत्सल भूमीने मस्तकी धारण केलेली आहे. याच भूमीने त्या अनुज लक्ष्मणाला प्रभू रामचंद्रांच्या फलाहारासाठी परिपक्व मधुर फळे, कंद देऊन त्यांची क्षुधा, तृषा शांत केली. इतकेच नव्हे तर भूमिकन्या माहेरी आली असे जाणून, मातेच्या वत्सलतेने तिला न्हाऊ घातले आहे. याचा पुरावा आजही साखरखेर्डा नजीक, शेंदुर्जनच्या पूर्वेला, सीता न्हाणी व राम कुंडांच्या रूपाने पहावयास मिळतो.

महानुभाव पंथाचे आद्यप्रवर्तक, परब्रम्ह तत्वाची ओळख देणारे “मायीन” श्रीचक्रधर स्वामींच्या काही लीळाचे निर्माण याच भूमीत झाले आहे.

महान संत, वीरशैव पंथाचे उदगाते, सद्गुरु श्री पलसिद्ध स्वामींचे राउळ आजही एक हजार वर्षांचा पारमार्थिक उन्नयनाचा इतिहास सांगण्यासाठी मोठ्या डौलाने गावाच्या दक्षिणेला उभे आहे.

संतकवी अमृतराय हे मुळचे कुलकर्णी साखर्खेर्ड्याचेच. प्रसिद्ध लावनिकार कवी “विष्णुदासा”नी काव्याशक्ती परमेश्वराने गुणगान करण्यासाठी उपयोगात आणली तर जीवनाचे सोने होईल, हा संदेश दिला. वे.श.सं.कै. तुकाराम शास्त्री काळे यांनी तो याच ग्रामातील पूर्व वेशीवरील मारुतीचे मंदिरात शेवली (मराठवाडा) च्या श्रीमंत घराण्यात जन्मलेला बाल ब्रम्हचारी वे.श.सं. तुकाराम शास्त्री काळे यांचे सहवासात आल्यानंतर रानावनात फिरणे सोडून देऊन कसबा पेठेतील श्रीराम मंदिरात येउन राहिला व संत “हरिहर” महाराज म्हणून प्रसिद्धीस पावला. महालक्ष्मीचे मंदिरा शेजारीच त्यांची पवित्र समाधी आहे.

श्रीसंत द्यानोबांनी पसायदानात मागितल्या प्रमाणे खळांची व्यंकटी सांडून संपूर्ण विश्वाला स्वधर्म सूर्याच्या प्रकाशा न्हाऊ घालण्यासाठी संतांची हि मांदियाळी या पुण्याभूमिवर पूर्वीपासूनच अवतरत होती. प.पु.समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज म्हणजे त्याचा परमोच्च बिंदू, त्यांच्या रूपाने साधलेला दिसून येतो, तो याच साखरखेर्डा ग्रामी.

परमेश्वराने हे जाणले आणि श्रीरामचे दुसरे रुप असलेल्या “नामा”चा या कलयुगांत प्रसार करण्यासाठी व आपल्या सारख्या असंख्य बद्ध जीवांचा, संसारात राहूनही नामस्मरणाने जीवनमुक्त करण्यासाठी प.पु. श्री. प्रल्हाद महाराज अवतरले. आणि म्हणूनच पिढ्यान पिढ्यांपासून अखंड रामनाम व रामसेवा हाच ज्या कुलाचा धर्म आहे, त्या पवित्र अशा साखर्खेर्ड्यातील काळे कुळात श्रीमहाराजांचा जन्म झाला.

ऐतिहासिकदृष्ट्या देखील, साखरखेर्डा हे गांव प्रसिद्ध आहे. दिल्लीवरून बऱ्हाणपूर रस्त्याने, औरंगाबाद-नगर मार्गे पुण्यास जाणारा रस्ता याच भागातून जात होता. त्यामुळे अनेक सेवा या मार्गाने गेलेल्या असून, अनेक लढाया देखील या भागाने अनुभवल्या आहेत. इ.स. १७२४ साली निजामशाहीच्या संस्थापक असफजहां आणि दिल्लीच्या मोगलांचा सुभेदार मुबारीजाखन यांच्यात लढाई होऊन निजाम विजयी झाला व त्याचे प्रतिक म्हणून या गावाचे नाव फत्तेखेर्डा असे ठेवण्यात आले. हा परगणा बनविला . पुढे इ.स. १९४८ नंतर हे नाव पुन्हा साखरखेर्डा असे करण्यात आले.