श्रींचे समाधी मंदिर

प.पू. सद्गुरु श्रीप्रल्हाद महाराजांचे समाधी मंदिर साखरखेर्डा गावाच्या मध्यभागी असून मंदिराला उत्तर व पश्चिम असे दोन प्रवेशद्वार आहेत. श्रींच्या समाधी मंदिरासमोर विस्तीर्ण सभामंडप आहे. श्रीमहाराजांच्या अखेरच्या ‘वचना’प्रमाणे “प.पू.श्रीरामानंद महाराजांचे चरणी (श्रीमहाराजांचे सद्गुरु) ‘मी’ लीन झालो आहे”, हे वचन पूर्ण करून, वयाच्या ८७ व्या वर्षी आपल्या पारमार्थिक जीवनकार्याची समाप्ती केली व समाधीस्वरुपात ते स्थिर झाले. श्रींची समाधी तळघरात व वरील मंदिरात श्री प्रल्हाद महाराजांच्या मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. येणाऱ्या सर्व सद्गुरु भक्तांना दर्शन सोयीचे व्हावे, अश्या पद्धतीने सभामंडपाचे बांधकाम करण्यात आली आहे.

सभामंडप परिसरातच श्रीसद्गुरु रामानंद महाराजांच्या चरण पादुका व मूर्तीची पुरातन श्रीबालनाथ मंदिरात स्थापना केलेली आहे. हे पुरातन श्री बालनाथ मंदिर देशपांडे घराण्याने श्रींना अर्पण केलेली आहे. श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वाणी अवतार कै.तात्यासाहेब केतकर ह्यांच्या हातून प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री प्रल्हाद महाराजांनी करवून घेतलेला आहे. ह्या सभामंडपातच दासमारुती व प.पू.जीजीमायचे मंदिर आहे.

नामप्रचार व संप्रदायाचा प्रसार ह्या हेतूने प.पू. श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी श्रीरामानंद महाराजांना दिलेले आणि श्रीरामानंद महाराजांकडून परंपरेने श्रीं प्रल्हाद महाराजांना प्राप्त झालेले काळ्या पाषाणावरील गंडकी शिळेतील कोरीव श्रीरामपंचायतन आजही श्री प्रल्हाद महाराजांच्या आज्ञेने श्रीरामानंद महाराजांच्या मूर्तीचे समोर आरूढ झालेले आहेत.

Leave a Reply